गुजरातमध्ये नवरात्रीत गरबा खेळताना २४ तासात १० जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये सध्या नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, याच काळात गरबा खेळताना तरुणांना हार्ट अटॅक आल्याच्या घटनाही समोर येत असून, गेल्या 24 तासांत विविध ठिकाणी एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमध्ये नवरात्रीनिमित्त गरबा खेळत असताना आणखी एका 17 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत गरबा खेळताना हार्ट अटॅकने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार, गरबा खेळत असताना 17 वर्षीय वीर शहाला हार्ट अटॅक आला आणि रक्तस्त्राव सुरू झाला.

वीर शहाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वीरने नवरात्रीच्या सहाव्या दिवशी गरब्यात भाग घेतला. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. सर्वांनाच धक्का बसला आहे. वीरच्या मृत्यूनंतर गरबा आयोजकांनी कार्यक्रम बंद केला. या संपूर्ण घटनेची माहिती वीरचे वडील रिपल शहा यांना देण्यात आली.

पालकांना वीरची माहिती मिळताच ते दोघेही तात्काळ पोहोचले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर रिपल शहा आणि त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. हात जोडून सर्व तरुणांना गरबा खेळताना स्वतःची काळजी घ्यावी आणि खेळताना ब्रेक घ्यावा, असं आवाहन रिपल शहा यांनी केलं आहे.

Leave a Comment